पिंपरी (प्रतिनिधी) – राज्य सरकारने इंधनावर सेस लावून केलेली दरवाढ ही निषेधार्ह आहे. ही दरवाढ केल्यान महागाईचा आणखी भडका उडणार आहे. राज्य सरकारने ही दरवाढ मागे घेऊन ढासळलेल्या अर्थव्यवस्थेसाठी उत्पन्नाचे दुसरे स्त्रोत शोधावेत. ही दरवाढ मागे न घेतल्यास एक दिवस काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवड यांनी दिला आहे.
फेडरेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार गजानन बाबर आणि कार्याध्यक्ष गोविंद पानसरे यांनी याबाबत एक पत्र प्रसिद्धीस दिले आहे. पत्रात त्यांनी म्हटले आहे की, कोविड-19 या महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटाने उद्योग, व्यापार क्षेत्रात गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. सर्वसामान्य माणूस अडचणीत सापडला आहे. क्रुड मालाच्या सतत वाढत्या किमतीमुळे इंधनाचे दर सारखेच वाढत आहेत.
अशा परिस्थितीत राज्य सरकारने इंधनावर सेस लावून केलेली दरवाढ ही निषेधार्ह आहे. वास्तविक केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारने उद्योगांना विशेष पॅकेज देऊन सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र, असे न करता ही दरवाढ केल्यामुळे महागाईचा भडका उडणार आहे.
उद्योगांची स्थिती अत्यंत नाजूक आहे. जीडीपीचा दर हा 4 टक्क्यांवर आलेला आहे. या दरवाढीमुळे कच्च्या मालाच्या वाहतूक खर्चात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे होरपळून निघालेले उद्योग-व्यवसाय आणखी मोठ्या आगीच्या खाईत ढकलले जाणार आहेत. कामगार वर्गालाही या महागाईचे चटके सोसावे लागणार आहे.