मुंबई : धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले असले तरीही त्याच्याकडे अद्याप बरेच क्रिकेट शिल्लक आहे. तो संघात निश्चितच पुनरागमन करु शकतो. तो चाळीशीत आला असला तरीही त्याची तंदुरुस्ती अफाट आहे. त्याचा दृष्टिकोन व त्याची समर्पण वृत्ती आजही संघासाठी फायदेशीर ठरणार आहे, असे मत बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या विश्वकरंडक २०१९ च्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध धोनी शेवटची मॅच खेळला होता. यानंतर धोनी टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसला नाही. मध्ये काही काळ धोनी लष्करी सेवा करण्यासाठीही गेला होता. भारताचा वेस्ट इंडिज दौरा, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यातही धोनी दिसला नाही.
त्यानंतर धोनीने आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते आणि त्यासाठी त्याने सरावही चालू केला होता, मात्र कोरोनामुळे आयपीएल स्थगित करण्यात आल्याने त्याचे क्रिकेटमधील पुनरागमन आणखी लांबले आहे.