नवी दिल्ली -वंदे भारत अभियानांतर्गत एअर इंडियाच्या 70 विमानांची अतिरिक्त उड्डाणे अमेरिका आणि कॅनडात होणार आहेत. त्यासाठी 11 ते 30 जून हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पात्र प्रवाशांना भारताबाहेर पाठवणे आणि अडकून पडलेल्या भारतीयांना स्वदेशी आणणे हे त्या उड्डाणांमागचे उद्दिष्ट आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी संबंधित माहिती दिली. आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची मागणी नागरिक मोठ्या संख्येने सरकारकडे करत आहेत. त्यासाठी विविध बाबींचा विचार करावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाला अनेक देशांची अनुमती नाही.
काही देश केवळ स्वत:च्या नागरिकांना आणि राजनैतिक अधिकाऱ्यांना तसा प्रवास करण्याची मुभा देत आहेत. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात आंतरराज्य आणि राज्यांतर्गत प्रवासाला आणखी मोकळीक मिळाली आहे.
त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय सेवा पुन्हा सुरू होण्याबाबत सुधारणा दिसेल, असा आशावाद पुरी यांनी व्यक्त केला. करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान सेवा 30 जूनपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.