सातारा(प्रतिनिधी) : बॅंकेच्या कर्जाचा बोजा साताबारा उतार्यावर चढवून देण्यासाठी तीन हजाराची लाच घेणारा वडूज (ता.खटाव) येथील सर्कल राजेंद्र मारुती जगताप (रा. सातारा) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील एका गावातील शेतकर्याच्या मुलाला शिक्षणासाठी पैसे लागणार असल्याने त्याने एका बॅंकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, त्या कर्जाची नोंद तारण दिलेल्या जमिनीच्या उतार्यावर केल्यानंतरच कर्जाची रक्कम त्या शेतकर्याला मिळणार होती. त्यामुळे त्याने सातबारा उतार्यावर कर्जाची नोंद घालण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज केला होता. त्यानंतर सदर अर्ज पुढील नोंदीसाठी संशयित जगताप याच्याकडे आला होता. मात्र, ती नोंद घालण्यासाठी त्याने पाच हजार रुपयांची लाच मागितली होती.
संबंधित शेतकर्याने याबाबत सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पोलीस निरीक्षक अविनाश जगताप यांनी वडूज परिसरात सापळा लावला होता. त्यानंतर तक्रारदाराकडून तडजोडी अंती तीन हजार रुपयांची लाच घेताना जगताप याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुषमा चव्हाण, उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा एसीबीच्या कर्मचाऱ्यांनी केली.