पिंपरी- लॉकडाऊनमुळे दोन महिने हाताला काम नाही. त्यातच पत्नीने घरखर्चाला पैसे मागितल्याने त्यांच्यात किरकोळ भांडण झाले. यामुळे आलेल्या नैराश्यातून पतीने गळफास घेतला. ही घटना रविवारी (दि. २४) रात्री भोसरी येथे घडली. सध्या पतीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रवीण गुलाबराव शेलार (वय ४२, रा. संत तुकाराम नगर, आळंदी रोड, भोसरी) असे गळफास घेतलेल्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण हे पेंटर आहेत. पत्नी दोन मुले असा त्यांचा परिवार आहे. लॉकडाऊनमुळे गेली दोन महिने त्यांना काम मिळाले नाही. त्यामुळे घरात पैशाची चणचण जाणवत आहे. त्यातच प्रवीण यांच्या पत्नीने रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घरखर्चासाठी पतीकडे पैशांची मागणी केली. या कारणावरून पती पत्नीमध्ये किरकोळ भांडण झाले. त्यानंतर पत्नी बाजुलाच राहणाऱ्या आपल्या जावेकडे गेली. त्यावेळी दोन मुले बाहेर अंगणात खेळत होती. पती प्रवीणने दरवाजा लावून घेतल्याचा आवाज ऐकून पत्नी घरी आली.
पत्नीने दरवाजा वाजवला मात्र आतून पतीने काहीच प्रतिसाद दिला नाही. यामुळे त्यांनी मोठमोठ्याने पतीला आवाज दिला. हा आवाज ऐकून प्रवीण यांचा भाऊ व शेजारचे नागरिक जमा झाले. पत्नीने खिडकीची काच फोडून आत पाहिले असता प्रवीण यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. यामुळे नागरिकांनी दरवाजा तोडून प्रवीण यांना त्वरित खाली उतरवले. सध्या ते बेशुद्ध अवस्थेत असून पिंपरीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक तपास भोसरी पोलीस ठाण्यातील हवालदार बबन मोरे करीत आहेत.