पुणे: करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी पुणे कॅटोंन्मेंट बोर्डाने लॉकडाऊनचा कालावधी 4 दिवसांनी वाढवला आहे. आता दि.24 ते 27 मेपर्यंत कॅन्टोन्मेंट परिसरामध्ये पूर्णत: लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत बोर्डाच्या हद्दीतील फक्त दूधविक्री आणि औषधांची दुकाने खुली राहणार आहे. मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी दि.23 मे रोजी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली राहणार आहेत.
कॅटोंन्मेंट हद्दीतील प्रामुख्याने भीमपुरा, मोदीखानासह जवळपासच्या परिसरातील करोना बाधितांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बोर्डातर्फे दि. 24 मे 27 मे असे चार दिवस कठोर लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत केवळ दूध आणि औषधे विक्रीची दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. नागरिकांनी या लॉकडाऊनच्या नियमांचे सक्तीने पालन करावे, असे आवाहन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनी केले आहे.
यापूर्वी प्रशासनाने दि. 19 ते 22 मे या कालावधीत जाहीर केलेल्या चार दिवसीय लॉकडाऊनचा कालावधी शुक्रवारी पूर्ण झाला आहे. एकीकडे महापालिका हद्दीत लॉकडाऊनचे नियम शिथिल होत असताना, लष्कर परिसर मात्र त्याला अपवाद ठरत आहे. करोना रुग्णांचे प्रमाण वाढल्याने बोर्डाकडून लॉकडाऊनचे कठोर पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.