थिरूवनंतपूरम – केरळमध्ये गुरूवारी 26 नवे करोनाबाधित आढळले. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी त्या राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ नोंदली गेली.
नव्याने आढळलेल्या करोनाबाधितांपैकी 7 जण नुकतेच परदेशांतून केरळमध्ये दाखल झाले आहेत. आता त्या राज्यातील करोनाबाधितांची संख्या 560 इतकी झाली आहे. त्यातील 493 रूग्ण याआधीच करोनामुक्त झाले आहेत. केरळमध्ये आतापर्यंत करोनाने तिघांचा बळी घेतला आहे. त्या राज्यात सध्या 64 करोनाबाधित रूग्णांवर उपचार चालू आहेत.
देशातील पहिले 3 करोनाधित केरळमध्ये आढळले होते. त्यानंतर तेथील सरकार आणि यंत्रणांनी वेगाने उपाययोजना करून करोना फैलावावर नियंत्रण मिळवण्यात लक्षणीय यश मिळवले. मागील काही दिवसांत त्या राज्यात अगदी मोजके करोनाबाधित आढळत होते. मात्र, अचानकपणे वाढलेली एकाच दिवसातील संख्या केरळची चिंता वाढवणारी ठरली आहे.
दरम्यान, तामीळनाडूतून एक व्यक्ती काही दिवसांपूर्वी केरळमध्ये दाखल झाली. त्या व्यक्तीला करोना संसर्ग झाला आहे. त्या बाधिताच्या संपर्कात आल्याने केरळमधील कॉंग्रेसच्या 3 खासदारांन आणि 2 आमदारांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे.