- गर्भवती पत्नी आणि मुलीसाठी कामगाराने केली लाकडाची गाडी
- गाडी ओढत केला पायी ८०० किमीचा प्रवास
बालाघाट : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात लॉकडाऊन वाढतच जात आहे. सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे देशात विविध ठिकाणी अडकलेल्या कामगारांना आपल्या घराची ओढ लागली आहे. त्यासाठी कामगार आपल्या घरी पायी जाण्याचा पर्याय निवडत आहेत. अशाच परिस्थितीत एका कामगाराने आपल्या कुटुंबासह गावी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र त्याचा हा पर्याय त्याच्यासाठी सोपा नव्हता कारण त्याच्यासोबत त्याची गर्भवती पत्नी आणि एक लहान मुलगी आहेत.
हैद्राबादमध्ये असणारा रामू नावाचा कामगार त्याच्या बालाघाट (मध्य प्रदेश) असणाऱ्या गावी निघाला आहे. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्याने एक लाकडी गाडी तयार केली आहे. दोन वर्षाची मुलगी आणि गर्भवती पत्नी या दोघींना या गाडी वर बसवून तब्बल ८०० किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्यांच्या या प्रवासात त्यांचे फक्त एकच ध्येय होते… ते म्हणजे काहीही करून घरी पोहचायचे आहे.
हैद्राबाद वरून बालाघाट पर्यंतचा तब्बल १७ दिवसांचा प्रवास पूर्ण केला. दरम्यान, राजेगाव गावाच्या सीमेवर पोहचल्यानंतर पोलिसांनी त्या कुटुंबाला मदत केली. तसेच त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहचण्यासाठी खासगी वाहनाची सोय केली. हा एवढा प्रवास पूर्ण करून अखेर कामगार आपल्या घरी पोहचला आहे. दरम्यान, आपले सर्व पर्याय संपल्यानंतर आपण हा पायी जाण्याचा पर्याय निवडला असल्याचे रामू यांनी म्हटले.