सातारा -सातारा तालुक्यातील करोना विषाणूमुळे उदभवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी परिपत्रकान्वये शुक्रवारी रात्री उशिरा नवीन आदेश जारी केले.
त्यानुसार सातारा तालुक्यातील सदरबझार, गार्डन सिटी, प्रतापगंज पेठ, कारागृह, गेंडामाळ, कोडोली (शिवाजीनगर) ही प्रतिबंधित क्षेत्र (कंटनमेंट झोन) वगळून सातारा शहरातील पोवई नाका ते नगरपालिका रस्ता, नगरपालिका रस्ता ते राजवाडा (राजपथ), पोवई नाका ते शाहू स्टेडीयम रस्ता, एस. टी. स्टॅन्ड ते राधिका चौक (राधिका रोड), पोवई नाका ते पोलीस मुख्यालयामार्गे मोती चौक या क्षेत्रामध्ये रस्त्याकडेची फक्त वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा संदर्भातील (किराणा, दूध, औषधे, फळे, भाजीपाला, पेट्रोलपंप आदी) दुकाने सुरु राहतील व इतर सर्व दुकाने बंद राहतील.
सलून दुकाने, दारुची दुकाने सुरु होणार नाहीत. तसेच वाईन, बिअर शॉप्स, देशी दारु दुकाने सुरु करण्याबाबत स्वतंत्र आदेश होणार असल्याने सद्यस्थितीत त्यांना सुरु करण्यास परवानगी नाही. जिल्हा रेड झोन असल्याने कंटेनमेंट झोन सोडून पुढील सूचनांचे पालन करण्यात यावे. केवळ परवानगी असलेल्या कामांसाठी व्यक्ती आणि वाहनांच्या हालचालीसाठी मुभा असल्याने तसेच चारचाकी वाहनांमध्ये वाहनचालकाव्यतिरिक्त जास्तीत जास्त 2 प्रवासी असतील व दुचाकी वाहनांवर मागच्या सीटवर व्यक्तीला बसता येणार नाही. जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण सर्व व्यक्तींच्या हालचाली अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा या कारणाशिवाय रात्री 7 ते सकाळी 7 या कालावधीत प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत.
औद्योगिक आस्थापनांनी त्यांच्या कामगार किंवा अधिकाऱ्यांसाठी सायंकाळी 7 नंतरच्या प्रवासासाठी कंपनीच्या बसनेच प्रवास करावा. त्यासाठी त्यांच्याकडे प्रांताधिकाऱ्यांकडील पास आवश्यक आहे. सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत कोणतीही वाहतूक त्यांना वैयक्तिक वाहनाने करता येणार नाही. तसेच परजिल्ह्यातून कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना प्रवास किंवा कामासाठी परवानगी नाही.
शहरी भागातील म्हणजे नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व मॉल्स, कॉम्प्लेक्स, बाजार संकुल, मार्केट बंद राहील. तथापि, बाजारपेठ आणि बाजार संकुलामध्ये अत्यावश्यक वस्तूची विक्री करणाऱ्या दुकानांना परवानगी राहील. सर्व एकल दुकाने किंवा निवासी संकुलातील सर्व दुकाने ही कंटेनमेंट झोन वगळून इतर क्षेत्रात चालू राहतील. ग्रामीण भागातील मॉल वगळता सर्व दुकाने अत्यावश्यक व इतर दुकाने सुरु राहतील.
सर्व ठिकाणी सामाजिक अंतर (दो गज की दूरी) राखले जाईल याची दक्षता घ्यावी. तसेच ही सर्व दुकाने सकाळी 9 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 या वेळेतच सुरु राहतील. कंटनन्मेंट झोन वगळता इतर सर्व ठिकाणी शेतीविषयक सर्व कामे सुरु राहतील. तथापि, सोशल डिस्टन्सिंग व इतर सूचनांचे पालन करने बंधनकारक आहे.
थुंकल्यावर आणि मास्क न वापरल्यास दंड
सातारा तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय जागा व सर्व खासगी जागा अशा कोणत्याही ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणीही थुंकल्यास त्याला 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. घराबाहेर पडताना व घरी परत येईपर्यंत चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक असल्याने तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर 500 रुपयांचा दंड आकारण्यात येईल.