पिंपरी (प्रतिनिधी) – दारूसाठी पैसे न दिल्याने तीन वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच एकाच्या खिशातील पैसेही जबरदस्तीने काढून घेतले. पिंपळे गुरव परिसरात गुरुवारी (दि. 7) रात्री ही घटना घडली.
पुनित कुंभार, विवेक चौरसिया आणि छोट्या (पूर्ण नाव नाही. रा. शिवनेरी कॉलनी, साठफूटी रोड, पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नाव आहे. सागर सुनील अग्रवाल (वय 23, रा. गुरुदत्त नगर, पिंपळे गुरव) यांनी शुक्रवारी (दि.8) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी अग्रवाल हे औषधांच्या दुकानात चालले होते. ते राजेंद्र जगताप यांच्या कार्यालयासमोर आले असता आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवून दारूपिण्यासाठी पैशाची मागणी केली. मात्र अग्रवाल यांनी पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून संतापलेल्या आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी अग्रवाल यांच्या खिशातील रक्कम काढून घेतली. तसेच रस्त्यालगतच्या तीन मोटारींची तोडफोड करून 20 हजार रुपयांचे नुकसान केले.