जिल्ह्यातील रुग्णसंख्या 116 वर
सातारा (प्रतिनिधी) : कराड तालुक्यातील आणखी एकाचा करोना रिपोर्ट शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या 116 झाली आहे. कराड तालुक्यातील पार्ले कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असणाऱ्या एकाचा करोना अहवाल शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित झालेल्या 116 जणांपैकी 94 जण सध्या उपचार घेत आहेत. 20 जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील येथील 2 महिला पोलीसांसह इतर 8, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 94, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 92, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील 7 व वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील 36 असे एकूण 237 जणांचे करोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 30, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये 8, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात 179, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयात 14 व वाईच्या ग्रामीण रुग्णालयात 27 अशा एकूण 258 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
करोनाबाधित रुग्णांच्या 14 दिवसानंतरचे 17 नमुने तसेच वरील 258 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.
मलकापूरमधील करोना बाधितांची संख्या 22 वर…
दरम्यान, कराडमध्ये शुक्रवारी सायंकाळी एक 20 वर्षीय युवती करोनाबाधित निष्पन्न झाली. ही युवती मलकापूर भागातील असल्याचे शनिवारी समजले. त्यामुळे मलकापूरमधील रूग्णांची संख्या आता 22 इतकी झाली आहे. करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कराड तालुक्यात करोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. दिवसागणिक या रूग्णात भर पडत आहे. शुक्रवारी सायंकाळी कराड तालुक्यात एक तर शनिवारीही एक करोनाबाधित रूग्ण आढळला आहे.