इस्लामपूर (प्रतिनिधी) : सहा मे पासून शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांला इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करण्याचा निर्णय इस्लामपूर नगरपालिकेतर्फे सर्वानुमते घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी नगरसेवकांच्या बैठकीत निर्णय झाला. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपनगराध्यक्ष दादासो पाटील, मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
गेल्या दिड महिन्यांपासून शहरात कोरोनाची दहशत होती.शहरात तब्बल २६ कोरोना बाधीत होते. सर्व रुग्ण आतां कोरोना मुक्त झाले आहेत. यामुळे शहरात पुन्हा कोरोनाच्या साथ येऊ नये म्हणून तातडीचा निर्णय घेतला गेला आहे.
इस्लामपूर शहरात पुणे व मुंबई येथून स्थलांतर करण्यासाठी तब्बल सतराशे व्यक्तींनी अर्ज दाखल केले आहेत. नव्याने शहरात येणाऱ्या नागरिकांच्या मुळे पुन्हा कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. तो रोखण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करण्याचे ठरले. तसेच सायंकाळी सात नंतर सर्व शहरात पूर्णतः लॉक डाऊन आहे. त्याची अंमलबजावणी कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेजारच्या गावातील नागरिक इस्लामपूर शहरात वास्तव करतात मात्र ते दिवसभर गावाकडे असतात. रात्री उशिरा इस्लामपुरात येतात अशा नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी उपनगराध्यक्ष दादासो पाटील यांनी केली.
शहरात असणाऱ्या शैक्षणिक संस्थानी आपली वसतिगृहे देण्याचे मान्य केले आहे. येथे येणारे नागरिक आरोग्य विभागाच्या सल्ल्याने इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करण्यात येतील. येथे त्या नागरिकांना त्यांच्या घरातील व्यक्ती जेवण पुरवतील. त्या वसतिगृहाची स्वच्छता करण्यासाठी नगरपालिका साहित्य पुरवणार आहे. नागरिकांना त्रास देणे हा हेतू नाही तर शहरातील अन्य लोकांच्या आरोग्याच्या हितासाठी हा निर्णय असल्याचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सांगितले.
आजच्या बैठकीला अनुपस्थित नगरसेवकाना हा निर्णय कळवायला पाहिजे. शहरात येणाऱ्या बाबत आमची नकारात्मक भूमिका नाही. आपण नगरपालिकेकडून केलेले नियम त्या नागरिकांनी पाळायला हवेत अशी भूमिका नगरसेवक शहाजी पाटील यांनी मांडली. नगरसेवक संजय कोरे, अमित ओसवाल, डॉ संग्राम पाटील, वैभव पवार, प्रदिप लोहार, चेतन शिंदे यांनी चर्चेत भाग घेतला.
शहरात नव्याने दाखल झालेल्या नागरिकांसह इतर नागरिकांना सर्व्हे करण्यासाठी राज्य शासना कडून १०० व्यक्तीची नेमणूक केली जाणार आहे. त्यांना नागरिकांनी माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.