नवी दिल्ली : गुजरातमधील वडोदरा येथे एका स्थलांतरित मजुराचा मृत्यू झाला आहे. हा मजूर सायकलवरुन अंकलेश्वर येथून उत्तर प्रदेशमधील आपल्या गावाकडे जात होता. मात्र वडोदरा येथे पोहचल्यानंतर सायकल चालवताना अचानक त्याला चक्कर आली आणि तो रस्त्यावर पडला. यातच त्याचा दुर्देवी अंत झाला.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना सायकल आणि त्यावर मागे बांधलेले कापडाचे एक गाठोडं आढळून आले. या व्यक्तीचे नाव राजू सहानी असे असल्याचे त्या गाठोड्यामध्ये सापडलेल्या कागदपत्रांवरुन स्पष्ट झालं. ४० वर्षीय राजू हा मुळचा कुशीनगर येथील राहणारा होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू अंकलेश्वर येथील एका खासगी कंपनीमध्ये काम करायचा. राजूने अंकलेश्वर ते वडोदरामधील करजान हे ५५ किमीचे अंतर सायकलने प्रवास करतच पूर्ण केले होते. राजू चक्क येऊन रस्त्याच्याकडेला पडल्याची माहिती काही प्रवाशांनी पोलिसांना फोनवरुन दिली. तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी राजूला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.