पुणे (प्रतिनिधी) : शहरातील केवळ काही भागातच आता करोनाचे रुग्ण सापडत आहेत. तर केंद्रशासनाकडूनही जिल्ह्याच्या निकषांवर शहरातील भागाचे रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन करण्याबाबत सूचना आल्या असून त्या धर्तीवर 3 मे नंतर शहराच्या काही भागातील लॉकडाऊन शिथिल केले जाऊ शकते असे सूतोवाच महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
3 मे नंतर केंद्र व राज्यशासन लॉकडाऊन बाबत जो निर्णय घेईल ता निर्णयावरच हा निर्णय असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुणेकरांना लॉकडाऊनमधून काहीसा दिलासा मिळून शहराच्या अर्थचक्राला चालना मिळण्याची चिन्हे आहेत.
वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती नुसार, शहरातील सुमारे 381 चौरस किलोमीटर क्षेत्रफळापैकी 31 चौरस किलोमीटर परिसरात करोनाचा जास्त प्रसार आहे. त्यातही प्रमुख्याने 15 मधील 5 क्षेत्रीय कार्यलय परिसरात रुग्ण वाढत असून उर्वरित भागात कमी प्रसार आहे. त्यामुळे केंद्रशासनाच्या निकषानुसार, शहराच्या हद्दीत रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन करून त्या त्या भागात नवीन सूचना नुसार लॉकडाऊन शिथिल केले जाईल. त्यात प्रामुख्याने बांधकाम तसेच काही शॉपचा समावेश असेल तसेच या ठिकणी गर्दी टाळण्यासाठी सर्व नियम आणि उपाय योजना खबरदारी घेऊनच याबाबत निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले.