बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता इरफान खान यांच्या निधनानंतर दुस-याच दिवशी सदाबहार अभिनेता ऋषी कपूर यांचेही निधन झाले. या दोन्ही कलाकारांची फॅन फॉलोइंग खूप मोठी असून दोघेही कॅन्सरसारख्या प्राणघातक आजाराने मरण पावले आहेत. एका दिवसाच्या अंतरातच बॉलिवूडमधील दोन बड्या सिताऱ्यांच्या अकस्मात निधनाने बॉलिवूड आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर या दोन्ही स्टार्सच्या मृत्यूबाबत अनेक चर्चा सुरू आहेत.
तसेच ऋषी कपूर आणि इरफान खान यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हे दोन्ही कलाकार एकत्र दिसतात. हा फोटो शेअर करत चाहत्यांनी पोस्ट केले आहे की, हे दोन्ही दिग्गज कलाकार एकत्रितपणे शेवटच्या प्रवासाला निघाले आहेत. हा फोटो 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या “डी-डे’ चित्रपटातील आहे. यात ऋषी कपूरने अंडरवर्ल्ड डॉन, तर इरफानने एका सिक्रेट सर्व्हिस एजंटची भूमिका साकारली होती.
हा फोटो व्हायरल होण्यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे, या चित्रपटाच्या अखेर ज्याप्रमाणे ऋषी कपूर आणि इरफान यांचा मृत्यू होतो. त्याप्रमाणे खऱ्या आयुष्यातही या दोघांचा अचानक मृत्यू झाला आहे. निखिल अडवाणी यांनी दिग्दर्शित केलेल्या “डी-डे’मध्ये ऋषी कपूर आणि इरफान यांच्याशिवाय अर्जुन रामपाल आणि हुमा कुरेशी हे मुख्य भूमिकेत दिसले होते.