शेवगाव – तालुक्यातील ढोरसडे गावाच्या शिवारात कांद्याच्या शेतात स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही बाब शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या लक्षात आल्यावर तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले.
ढोरसडे येथील शेतकरी बाबासाहेब खंबरे यांच्या शेतात कांदा लागवड केलेल्या क्षेत्रात अज्ञात व्यक्तीने स्त्री जातीचे नवजात अर्भक एका झाडाच्या बाजूला ओलसर जमीन थोडी उकरुन ठेवले होते. ही बाब सकाळी अकराच्या सुमारास बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने शेतात काम करणाऱ्या लोकांच्या लक्षात आली. दरम्यान गावकऱ्यांनी तात्काळ शेवगाव पोलिसांना या घटनेची माहिती देताच पोलीस निरीक्षक रामराव ढिकले आपल्या कर्मचाऱ्यांच्या समवेत घटनास्थळी दाखल झाले.
ढिकले यांनी दहिगावने येथील प्राथमिक आरोग्य विभागाला संपर्क साधून डॉक्टरांना पाचारण केले. डॉ. कैलास कानडे यांनी त्या नवजात बालकाची आरोग्य तपासणी केल्यानंतर शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान ढिकले यांनी अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेला संपर्क साधून त्या बाळाचे संगोपन करण्यासाठी कळवले आहे. सायंकाळपर्यंत स्नेहालयचे कर्मचारी येऊन बालकाला घेऊन जाणार आहेत.