एक महिला व तीन पुरुषाचा समावेश
डोर्लेवाडी : देशासह महाराष्ट्रात देखील करोनाने थैमान घातले आहे. यात पुण्यात मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. यात मंगळवारी रात्रीच्या वेळेस पोलिसांची नजर चुकवून चार जण बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी ( वैदू वस्ती ) गावात दाखल झाले आहेत. बारामती एकूण आठ करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जणांनी करोनावर मात केली आहे. एकावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत यामुळे बारामती करोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीकडे विशेष लक्ष आहे.
त्यांच्या सूचनेनुसार शहरात बारामती पॅटर्न राबवून तो यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, काहीजण लॉकडाऊन असताना ही पोलिसांची नजर चुकवून पुणे आणि इतर जिल्ह्यातुन रात्रीच्या वेळेस प्रवास करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत.
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावातील वैदू वस्तीतील चार जण मंगळवारच्या रात्री आले आहेत त्यात एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. असे असताना त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती विनाकारण चौकात फेरफटका मारत आहेत. यामुळे डोर्लेवाडीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण फसरले आहे.
डोर्लेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच पोलिस पाटील, सदस्य, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी शहर पोलिसाना बाहेरून आलेल्या व्यक्तीबाबत कल्पना दिली. बारामती शहराचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, सहाय्य पोलीस निरीक्षक पदमराज गंफले यांनी डोर्लेवाडी गावात येऊन वैदू वस्तीवर जाऊन पुण्यावरून आलेल्या चार जणांना डोर्लेवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्यांना १४ दिवसासाठी होमक्वारंटाईन केले आहे.
त्यांना लागणाऱ्या सर्व सुख सुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्यांची वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करण्यात आली आहे. त्यांना सध्यातरी कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. मात्र खबरदारी घेणे गरजेचे आहे, जर कोणी प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा देखील पोलिसांकडून देण्यात आला आहे.