पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वायसीएम रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टर तणावात असतानाच आता पुण्यातील संशयित रुग्णांचे ओझेही वाढू लागले आहे. पुण्यातील महापालिका व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी असल्याने पुणे महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील रुग्णांना वायसीएममध्ये पाठविले जात आहे. या प्रकारामुळे अगोदरच त्रस्त असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकाराबाबत वरिष्ठही काहीच बोलत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात बाधित रुग्णांची संख्या “शंभरी’च्या पुढे गेली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या संकटामुळे महापालिकेचा आरोग्य व वैद्यकीय विभाग या महामारीला तोंड देण्यासाठी तसेच करोनाच्या रुग्णांना वाचविण्यासाठी दिवस रात्र कष्ट घेत आहे. शहरातील रुग्णांची संख्या वाढण्याच्या शक्यतेमुळे महापालिकेच्या वतीने गेल्या महिन्यातच संपूर्ण वायसीएम रुग्णालय करोनाच्या रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले आहे. या ठिकाणी सर्व सुविधा सुसज्ज ठेवण्यात आल्या असून 24 तास रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
एका बाजूला शहरातील रुग्ण वाढत असतानाच पुणे महापालिका हद्दीतही करोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ससून रुग्णालयासह महापालिकेच्या नायडू रुग्णालयासह काही रुग्णालयात करोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णांची संख्या आणि उपलब्ध असलेली रुग्णालये यामध्ये तफावत निर्माण झाल्याने तसेच सध्याच्या रुग्णालयावरील ताण वाढल्याचे चित्र पुण्यात दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाने नवीन रुग्णालये उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असताना तसा निर्णय घेताना महापालिका प्रशासन दिसून येत नाही. वाढणारी संख्या आणि अपुरी सुविधा यामुळे पुणे महापालिका आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील संशयित पिंपरी-चिंचवड महापालिकच्या वायसीएम रुग्णालयात धाव घेत असल्याचे गेल्या आठवडाभरापासून दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे पुण्यातील प्रशासकीय अधिकारीच संशयितांना वायसीएममध्ये पाठवित असल्याची चर्चा वायसीएममधील कर्मचारी, डॉक्टर व अधिकाऱ्यांमध्ये रंगली आहे.
पुणे महापालिकेने नव्याने बांधलेली व जुन्या रुग्णालयांचे नूतनीकरण केल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र या ठिकाणी करोना बाधितांवर उपचार करण्याऐवजी वायसीएममध्ये रुग्णांना पाठविले जात असल्याच्या तक्रारींमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या आठवडाभरात पुण्यातील तसेच खडकीतील काही रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने पिंपरी-चिंचवडमधील रुग्णांच्या संख्येत भर पडत असून आकडाही वाढत असल्याने शहरातील नागरिकांमध्येही दहशत निर्माण होऊ लागली आहे. असाच प्रकार चालत राहिल्यास वायसीएमवरील भार आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
रोज 10 ते 14 रुग्ण
पुणे महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून वायसीएम रुग्णालयात किमान 10 ते 14 संशयित रुग्ण तपासणीसाठी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. यापैकी एखादा-दुसरा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने शहरातील यंत्रणेवर भार पडत आहे. तर संशयित करोनाची तपासणी करण्यासाठी येणारा खर्चही पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीतूनच होत आहे. पुणे महापालिका सक्षम असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिकेवर हा बोजा का टाकला जात आहे? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
होय काही रुग्ण येताहेत – वाबळे
पुणे महापालिका आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून काही रुग्ण वायसीएममध्ये येत असल्याचे आमच्याही निदर्शनास आले आहे. काल (मंगळवारी) खडकीतील एका संशयिताला करोनाची बाधा झाल्यामुळे हा प्रकार समोर आला आहे. गत आठवड्यात तपासणीसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी होती. गेल्या दोन तीन दिवसांत हे रुग्ण कमी झाले आहेत. या रुग्णांना वायसीएममध्ये कोण पाठविते किंवा ते स्वत: येतात याबाबत आपणाला माहिती नाही. मात्र येणाऱ्या रुग्णावर उपचार करणे हे आमचे कर्तव्य समजून आम्ही उपचार करीत असल्याची प्रतिक्रिया वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना दिली.
खडकीतील महिलेचा मृत्यू
रविवार पेठ, पुणे स्टेशन, देहूरोड परिसरातील चारजणांना करोनाची लागण
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल असलेल्या खडकीतील करोनाबाधित पन्नास वर्षीय महिलेचा आज (बुधवारी) मृत्यू झाला. त्यामुळे महापालिका हद्दीबाहेरील मृत झालेल्या व्यक्तींची संख्या दोनवर पोहोचली आहे. तर शहरात रहिवाशी नसलेल्या मात्र संशयित म्हणून तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात आलेल्या आणखी चारजणांना करोनाची बाधा झाली आहे. यामध्ये पुण्यातील रविवार पेठ व पुणे स्टेशन तसेच देहूरोड परिसरातील नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे हद्दीबाहेरील मयतांची संख्या दोन झाली असून हद्दीबाहेरील बाधित रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात हद्दीबाहेरील रुग्ण उपचारासाठी येत असल्यामुळे महापालिका प्रशासनावरील ताण वाढलेला असतानाच आज पुन्हा महापालिका हद्दीबाहेरील चार रुग्णांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये 11 वर्षीय लहान मुलासह 46 वर्षीय पुरुषाचा तर 5 आणि 11 वर्षीय मुलींचा समावेश आहे.
खडकी परिसरातील रहिवाशी असलेल्या 50 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली होती. या महिलेवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. करोनाने शहरात आजपर्यत पाच जणांचे बळी घेतले आहे. त्यामध्ये शहरातील दोन व शहराबाहेरील तीन रुग्णांचा समावेश आहे. 12 एप्रिल रोजी एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. सोमवारी (दि. 20) निगडीमधील एका महिलेचा मृत्यू झाला. त्याच दिवशी पुणे येथील रहिवाशी मात्र पिंपरीतील वायसीएममध्ये दाखल असलेल्या महिलेचाही मृत्यू झाला. तर आज खडकी येथील रहिवाशी असलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.