पिंपरी – पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हेगार आता पोलिसांना देखील सोडत नसल्याचे दिसून आले आहे. चाकण जवळील रासे गावाच्या हद्दीत तर पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करुन लुटण्यात आले होते. पोलिसांनी तीन आरोपींना मुद्देमालासह गुन्हे शाखा युनिट तीन आणि वाहन चोरी विरोधी पथकाडून अटक करण्यात आली.
अश्विन अरुण रोकडे (वय 27), शाहरुख इजाजखॉं पठाण (वय 22), प्रतिक योगीराज खडसे (वय 21, तिघेही रा. अरुण कुसाळकर यांचे फ्लॅटमध्ये, शिक्रापुर रोड, चाकण, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
इंदरकुमार तुकाराम धोत्रे हे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते चाकण पोलीस ठाण्यात पोलीस नाईक या पदावर काम करतात. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास धोत्रे सरकारी गणवेशामध्ये ड्युटीकरीता दुचाकीवरून जात होते. ते चाकणजवळील रासे गावच्या हददीत आले असता आरोपींनी त्यांना मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाइल व रोख रक्कम असा नऊ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला होता. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे यांना आरोपींबाबत माहिती मिळाली, त्यानुसार आरोपींना पकडून त्यांच्याकडून फिर्यादी यांचा मोबाइल फोन व गुन्हयात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.