बारामती- देशात आणि राज्यात तीन मेपर्यंत संचारबंदी लागू आहे मात्र पिंपळी येथील युनायटेड स्प्रिट कंपनी समोरील रस्त्यावर चार दिवसांपासून व्यापाऱ्यांनी शहर पोलीस आणि पिंपळी ग्रामपंचायतला न जुमानता रस्त्यावर भाजीपाला विक्री सुरू केली होती. सूचना देऊनही भाजीपाला विक्री बंद न केल्याने विक्रेते, आणि खरेदीदार यांच्यावर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
यामध्ये व्यापारी यांचेसह भाजीपाला विक्री करणारे बारामती भागातील ४१ भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सध्या बारामतीत सात कोरूना बाधित रुग्ण सापडले आहेत त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे त्यामुळे बारामती रेड झोन मध्ये आहे. येणाऱ्या २८ एप्रिल पर्यंत कोरोना बाधित रुग्ण न आढळल्यास बारामती ऑरेंज झोनमध्ये जाणार आहे मात्र संचारबंदीचे उल्लंघन करून गर्दी करत सोशल डिस्टन्स न पाळता नागरिक संचार बंदीचे उल्लंघन करत राहिल्यास कोरोना चा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यामुळे संचारबंदी चे उल्लंघन करणाऱ्या ४१ जणावर आज बारामती शहर पोलिसांनी कारवाई करण्यात केली आहे.
चार दिवस व्यापारी, विक्रेते यांना समज देऊन देखील नियमांचे उल्लंघन करीत पिंपळी ( बारामती ) येथे भाजीपाला विक्री सुरूच ठेवल्याचे निदर्शनास आल्याने आज बारामती परिसरातील जवळपास ४१ भाजीपाला विक्रेते व व्यापारी यांच्यावर टू व्हीलर व मालवाहतूक गाड्यांसह त्यांना ताब्यात घेतले. लॉकडाऊन असून देखील शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून भाजीपाला खरेदी विक्री करणारे जवळपास दोन हजारच्या आसपास ग्राहक येत होते ते कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता गर्दी करत होते. यामुळे या सर्वांवर १८८ नुसार कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले.
या भाजीपाला विक्रेत्यामुळे पिंपळी ,बांदलवाडी-सत्यसाईनगर, जळोची मधील नागरिक कोरोना संसर्गच्या भीतीने भयभीत झाले होते. आज केलेल्या कारवाईने पिंपळी आणि शेजारील परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आज झालेल्या कारवाईचे छत्रपती कारखाना संचालक संतोष ढवाण, पिंपळी लिमटेक चे सरपंच रमेश देवकाते, पोलीस पाटील मोहन बनकर, ग्रामपंचायत सदस्य सुनिल बनसोडे, नितीन देवकाते, दादा थोरात, धनाजी जाधव, निलेश गायकवाड आदींनी पोलिसांचे आभार मानले. त्याचबरोबर रात्रंदिवस जनतेची सेवा करणाऱ्या पोलिसांना कोरोना सोल्जर्स सुनिल बनसोडे यांच्यावतीने चांगल्या प्रतीचे मास्क वाटप करण्यात आले.