कराची – भारत व पाकिस्तान यांच्यात मैदानावर सामना सुरु असताना जणू त्याला युद्धाचेच स्वरुप येते. मात्र, वैयक्तिक पातळीवर दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांचे चांगले मित्र आहेत. भारताचा महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे तर माझ्या मोठ्या भावासारखा आहे, अशा शब्दात पाकिस्तानचा माजी कसोटीपटू ऑफस्पिनर सकलेन मुश्ताक याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
कुंबळे व मी एकाच काळात क्रिकेट खेळलो. अर्थात त्याचे स्थान माझ्यापेक्षा मोठे आहे हे देखील मान्य करतो. पण तसे पाहायला गेले तर दोन्ही देशांच्या संस्कृतीत मोठ्यांचा आदर करायला शिकविले जाते. लहानपणापासून हेच संस्कार माझ्या घरातूनही मला मिळालेले आहेत. जेव्हा भारताविरुद्ध सामना खेळला जायचा त्यावेळी नेटमध्ये सराव करताना तसेच विविध कार्यक्रमात किंवा हॉटेलमध्ये मी आणि कुंबळे अनेकदा भेटलो. आमच्यात अत्यंत चांगला संवाद होत असे. त्याचे सल्ले मला माझ्या कारकीर्दीत खूप लाभदायक ठरले. सुरवातीला त्याच्याशी कसे बोलायचे असे मला दडपण वाटायचे पण जेव्हा संवाद सुरु झाला तेव्हा तो कामगिरीनेच नव्हे तर मनानेही मोठा असल्याचे जाणवले, असेही सकलेन म्हणाला.
एखादी मोठी स्पर्धा असते तेव्हा तिथे कुंबळे अनेकदा भेटला आहे. चांगल्या गप्पा होतात. त्याच्याशी चर्चा करताना त्याचे क्रिकेटबाबतचे ज्ञान आणि अभ्यास प्रचंड असल्याचे समजते. त्याच्या मतांचा आपल्या दृष्टिकोनावरही परिणाम होतो, असेही सकलेनने सांगितले.