पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवडमध्ये करोनाने दुसरा बळी घेतला आहे. पुण्यातील कमांड रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या आणि निगडी भागातील रहिवाशी असलेल्या ६२ वर्षीय करोना बाधित महिलेचा सोमवारी (दि.२०) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
निगडी परिसरात राहणाऱ्या या ६२ वर्षीय महिलेला १८ एप्रिल रोजी करोनाची लागण झाली होती. या महिलेवर पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या महिलेचा सोमवारी (दि. २०) रात्री मृत्यू झाला. दरम्यान, या महिलेला नेमकी करोनाची लागण कशी झाली होती? याची माहिती समजू शकली नाही. या महिलेच्या संपर्कातील चार जणांचे रिपोर्ट मात्र करोना निगेटिव्ह आले आहेत.
आत्तापर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये ६२ करोनाचे ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळले असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर १८ रुग्ण हे करोनामुक्त झालेले आहेत. तसेच सध्या शहरात ४२ करोनाचे रुग्ण असून ३६ जणांवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर उर्वरित ६ जणांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.