पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कन्टेंन्टमेंट झोन परिसरात कडक निर्बंध घालण्यात यावेत. या भागातील नागरिकांना वारंवार ये- जा करता येणार नाही. त्याचबरोबर या भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहे व अन्य परिसरात स्वच्छेतेची विशेष दक्षता बाळगावी. येथील नागरिकांना फ्लूसदृश लक्षणे आढळल्यास त्यांनी तत्काळ तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. तसेच रॅपिड टेस्टमार्फत देखील संभाव्य रुग्ण शोधण्यावर भर द्यावा. तर, हॉटस्पॉट जाहीर करण्यात आलेल्या ग्रामीण भागात देखील कडक निर्बंध अवलंबवावे लागणार आहेत, असे निर्देश पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत देण्यात आले आहेत.
विभागीय आयुक्तालयात झालेल्या या बैठकीला राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बीष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मजुरांसाठी कम्युनिटी किचन सुरू करावेत
पोलिसांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेच्या दृष्टीने मोबाइल व्हॅनद्वारे तपासणीवर भर द्यावा. पोलिसांना एन-95 मास्क व आवश्यक ती साधने उपलब्ध करुन द्यावीत. मजुरांसाठी कम्युनिटी किचन सुरू करावेत. यासाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घ्यावा. रेशन वितरण योग्य पद्धतीने यावे. कोणीही अन्नधान्यापासून वंचित राहता कामा नये, याची दक्षता घ्यावी. करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी अनेक सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत. त्यासाठी मार्केट कमिटी, सहकारी संस्थांनी पुढे यावे आणि अर्थसहाय्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.