राहुरी -“कोरोना’ व्हायरसच्या परिस्थितीत तालुक्यातील वांबोरी येथील लेखक आशिष निनगुरकर यांनी घरात राहून “कोरोना’ विषयक सामाजिक संदेश देणारा नियम हा लघुपट तयार केला आहे. वर्क फ्रॉम होमच्या धर्तीवर घरीच हा लघुपट चित्रीत झाला. आशिष हे मूळचे वांबोरी येथील असून गेल्या वर्षांपासून ते मुंबईत डाक विभागात नोकरीस आहेत.तसेच ते मराठी चित्रपटसृष्टीत लेखक – गीतकार म्हणून कार्यरत आहेत.”लॉकडाऊन’ मूळे ते सध्या महिनाभरापासून “वांबोरी’ गावातील घरीच आहेत. सरकारने “लॉकडाऊन’च्या काळात अनेक “नियम’ दिले आहेत.
पण या नियमांचे काही ठिकाणी पालन होते, तर काही ठिकाणी उल्लंघन होते. याचे चांगले-वाईट पडसाद उमटतात. आपण जर हे नियम पाळले नाहीत, तर काय होऊ शकते? त्याचा परिणाम आपल्याला कसा भोगावा लागणार आहे? आपण स्वतः आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला नको का? आपल्यामुळे इतरांना त्रास झाला तर चालेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या लघुपटाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचविण्याचा त्यांनी विडा उचलला.स्वतःचा “मोबाईल’ हा “कॅमेरा’, घरातील “कुटूंब’ हेच “कलाकार’ आणि स्वतःचे राहते “घर’ हेच “लोकेशन’ वापरून “नियम’ हा लघुपट निर्मित केला आहे. आशिष सोडला तर या क्षेत्रात बाकी घरातील सर्व नवखे आहेत. आशिषने शॉर्टफिल्मची संकल्पना घरात ऐकवली आणि अवघ्या एक दिवसात “नियम’ नावाचा सामाजिक संदेश देणारा हा लघुपट चित्रीत झाला.
आजकालची पिढी ही आपल्या पालकांच्या गोष्टी ऐकत नाही. त्यांना असे वाटते की, आपण जास्त शिकलो आहे. पण या लघुपटातून एक मुलगा जेव्हा घराबाहेर जाऊन येतो. मात्र तो नियम पालन करीत नाही. मला काहीही होणार नाही, मी ठणठणीत बरा आहे, अशीच त्याची वृत्ती आहे.नियम न पाळल्यामुळे तो “कोरोना’ हा विषाणू घरात घेऊन येतो आणि वयाने जास्त असलेल्या त्याच्या आई आणि वडिलांना तो विषाणू जडतो.नंतर जेव्हा हे त्या मुलाला समजते.
तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. मग पुन्हा हा लघुपट “रिवायन्ड’ होतो आणि मुळपदावर येतो. तेव्हा मग तो मुलगा नियमांचे पालन करायला लागतो.पायाला ठेच लागल्यानंतर माणूस कसा शहाणा होतो, अशी लघुपटाची मांडणी आहे. नियम या लघुपटाची निर्मिती “काव्या ड्रीम मुव्हीज’ अंतर्गत किरण निनगुरकर यांनी केली असून या लघुपटात आशिषचे वडील अशोक निनगुरकर, त्याची आई जयश्री निनगुरकर व चुलत भाऊ स्वरूप कासार यांनी भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शन आशिष निनगुरकर यांनी केले आहे.