पुणे – शहरातील सर्व औषध विक्रेत्यांना दिवसभरातील येणाऱ्या सर्व ग्राहकांची माहिती पोलिसांना दररोज सायंकाळी 8 वाजेपर्यंत द्यावी लागणार आहे. यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला असून, त्याच्यावर बिनचूकपणे फोटो कॉपी पाठवावी लागणार आहे. याबाबतचे आदेश सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काढले आहेत.
अनेकदा सर्दी, खोकला, किंवा ताप आला तर नागरिक स्वतः औषधाच्या दुकानात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषधे खरेदी करून सेवन करतात. मात्र, सध्या करोनाबाबतीत देखील हीच प्राथमिक लक्षणे आहेत. त्यामुळे नागरिक आपल्या मनाने करत असलेले उपचार त्यांच्यासाठी व इतरांसाठी देखील धोक्याचे ठरू शकतात.
अशी आहे नियमावली
सर्दी ताप, कोरडा खोकला, श्वसनाचा त्रास होणे यासाठी लागू पडणाऱ्या औषधांची मागणी करणाऱ्या ग्राहकांची नोंद त्यांचे नाव, पत्ता व फोन नंबरसह करावी लागणार आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणेज डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनविना औषधांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची नोंद प्राधान्याने करणे बंधनकारक. औषधे कोणासाठी घेतली जात आहेत. याची ग्राहकांकडे चौकशी करावी लागणार, त्या रुग्णांची नावासह नोंद ठेवावी.
दररोज सांयकाळी आठ वाजता शहर पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअप क्रमांक 8975953100 या नंबरवर ग्राहकांची नोंद ठेवली फोटो कॉपी पाठवावी लागणार आहे.
माहिती पाठविताना औषध विक्रेत्याच्या दुकानाचे नाव व संपर्क क्रमांकाची नोंद करणे गरजेचे आहे.
आजारी व्यक्तीला करोना संसर्गाची लक्षणे आढळून येत असल्यास त्याला मनपा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी घेऊन जाण्याबाबत मार्गदर्शन करावे. तसेच फ्लू क्लिनिक शहरात कोठे सुरू आहेत, याची यादी ग्राहकांना दिसेल अशा दर्शनी भागात लावावी लागणार आहे. ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी करणार नाहीत याच बरोबर सामाजिक अंतराची दक्षता घ्यावी. पोलिसांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे औषध विक्रेत्यांना बंधनकारक असणार आहे.