नवी दिल्ली – दूरदर्शन ही भारतीय जनता पक्षाची खासगी मालमत्ता नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीतराम येचुरी यांनी केली आहे. दूरदर्शनचा वापर करून भाजपने स्वताचाच जनसंपर्काचा कार्यक्रम सुरू केला आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून दूरदर्शनवर भारतातील जनता मोदींचे कसे आभार मानीत आहे आणि सरकारच्या विविध योजनांमधून त्यांचा कसा लाभ होत आहे याचीच माहिती प्रसारीत होत आहे, दूरदर्शन ही सरकारी मालकीची असून ती लोकांच्या पैशावर चालते. ती भाजपची खासगी मालमत्ता नाही त्यांनी या माध्यमाचा उपयोग आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी करू नये, असेही त्यांनी सरकारला सुनावले आहे.
सरकार या अडचणीच्या काळात केवळ श्रीमंतांसाठीच कसे काम करते असे नमूद करताना येचुरी यांनी म्हटले आहे की, उत्तराखंडमध्ये अडकलेल्या श्रीमंत प्रवाशांना परत आणण्यासाठी 253 मोफत लक्झरी बसेस पाठवल्या जातात, राजस्तानातील श्रीमंतांच्या मुलांना परत आणण्यासाठीही शंभर बसेस पाठवल्या जातात. आणि विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांना मात्र तेथेच उपाशीपोटी खितपत ठेवले जात आहे.