श्रीनगर : दहशतवाद्यांनी शनिवारी उत्तर काश्मीरमध्ये केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) तीन जवान शहीद, तर तितकेच जवान जखमी झाले. ती घटना सोपोरमध्ये घडली. सीआरपीएफचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस तैनात असलेल्या तपास नाक्यावर दहशतवाद्यांनी अचानकपणे बेछूट गोळीबार केला.
त्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. हल्लेखोर दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी तातडीने मोहीम हाती घेतली. काश्मीर खोऱ्यात आठवडाभरात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांना लक्ष्य करून तिसरा हल्ला घडवला.
देशातील इतर भागांप्रमाणेच जम्मू-काश्मीरलाही करोना संकटाचा मुकाबला करावा लागत आहे. त्या स्थितीचा गैरफायदा घेण्याचे नापाक मनसुबे बाळगणाऱ्या दहशतवाद्यांच्या कारवाया मागील काही दिवसांपासून वाढल्या आहेत. मात्र, दहशतवाद्यांचे डाव उधळून लावण्यासाठी सुरक्षा दलेही सज्ज आहेत.