नवी दिल्ली : तबलिगी जमात मरकजचे प्रमुख मौलाना साद यांच्याविरोधात पैशांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आरोपाखाली सक्तवसुली संचलनालयाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मौलाना साद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर काही तासातच ईडीकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मौलाना साद यांच्या संस्थेला परदेशातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळत असून त्याची कोणतीही माहिती सरकारला देण्यात आली नसल्याचा सक्तवसुली संचलनालयाला संशय आहे. सक्तवसुली संचलनालयाकडून मौलाना साद यांच्या आठ सहकाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांनी सांगितल्यानुसार, मरकजच्या सर्व खात्यांची छाननी केली जात आहे. सक्तवसुली संचलनालय देखील मरकजला मिळालेला निधी मनी लॉण्ड्रिंगचा भाग होता की हवाला चॅनेल्सचा वापर करण्यात आला याचा तपास करत आहेत. दरम्यान आयकर विभागदेखील जाहीर न केलेले उत्पन्न, विश्वस्तांकडून आयकर चोरीचा प्रयत्न आणि निधीचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करण्यात आला का ? याचा तपास करणार आहे.
दिल्ली पोलीस क्राइम ब्रांच मरकजच्या फंडिंगबाबतचा अहवाल सक्तवसुली संचलनालय आणि आयकर विभागाकडे सोपवणार आहे. मौलाना साद अद्याप चौकशीसाठी क्राइम ब्रांचसमोर हजर झालेले नाहीत. एका इंग्रजी वर्मनपत्रानुसार, क्राइम ब्रांचचा अहवाल आणि मौलाना साद यांचा जबाब आर्थिक तपास यंत्रणांकडून वापरला जाणार आहे.