देहूरोड – गंगुबाई बबन शिंदे (वय 82, रा. शिवाजीनगर, देहूरोड) असे मृत्यू झालेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. मृत्यूनंतर कोणतेही प्रमाणपत्र न घेता अंत्यविधी करण्यात आल्याने सुनेसह आठ जणांविरुद्ध देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार (दि. 12) शिवाजीनगर, देहूरोड येथे घडली.
शोभा शंकर शिंदे (वय 40, रा. देहूरोड), पंकज गोपाळ तंतरपाळे, रेव्ह. डॉ. सोलोमनराज भंडारे, राजू रामस्वामी मारीमुत्तू, गोविंद मंचल यासह आणखीन स्मशानभूमीतील तीन रखवालदार असे आठ जणांविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यामध्ये मोहम्मद रफी उल्ला उद्दीन सय्यद (वय 54, रा. संत तुकारामनगर, पिंपरी, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य निरीक्षक) यांनी फिर्याद नोंदविली आहे.
शोभा शिंदे यांची सासू गंगुबाई यांचा रविवारी राहत्या घरी मृत्यू झाला. मृत्यूनंतर कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड यांच्याकडून स्मशान दाखला न घेता अंत्यविधी केला. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी अकस्माक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, याप्रकरणी आरटीआय कार्यकर्ते श्रीजीत रमेशन याने वयोवृद्ध महिलेचा मृत्यू नक्की कोणत्या कारणाने झाला. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कदाचित करोनाने तिचा मृत्यू झाला का अशी शंका निर्माण करीत, करोना विषाणूचा प्रसार होण्याची दाट शक्यता वर्तवत सोशल मीडियातून या घटनेचा प्रसार केला होता. याप्रकरणी वरिष्ठांच्या आदेशान्वये देहूरोड ठाण्यामध्ये बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.