पेठ ( वार्ताहर) : आंबेगाव तालुक्यातील शिक्षकांना विमा संरक्षण व आरोग्य संरक्षण किट देण्याची मागणी आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर व सरचिटणीस सुनिल भेके यांनी गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आंबेगाव तालुक्यात कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिक्षकांना दैनंदिन कुटुंब सर्व्हेक्षण करण्याची जबाबदारी दिली असून त्यानुसार दररोज सायंकाळी ५ वाजता दैनंदिन अहवालासोबत परतालुक्यातून आलेल्या नागरिकांची व सर्दी ,ताप, खोकला,न्यूमोनिया आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची यादी आरोग्य विभागामार्फत ग्रामसेवक व तलाठी यांनी तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना दैनंदिन माहिती देण्याचे आदेश प्रांताधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिलेले आहेत.
सदर कुटुंब सर्व्हेक्षणाचे काम करत असताना शिक्षकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा खूप मोठा धोका आहे. त्यामुळे सदर सर्व्हेक्षणाचे काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना विशेष विमा संरक्षण देण्यात यावे तसेच सर्व्हेक्षण करताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून शिक्षकांना पीपीई किट देण्याची मागणी शिक्षक संघाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे.
२७ मार्च रोजी बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांच्या हातावर गृह विलागीकरणाचे शिक्के मारणे व ६ एप्रिल रोजी कुटुंब सर्व्हेक्षणाचे काम तालुक्यातील सर्व शिक्षकांना देण्यात आले होते. सदर काम करत असताना शिक्षकांनी मास्क,सॅनिटायझर,हॅन्ड ग्लोव्हज इ. साहित्याची मागणी ग्रामपंचायतकडे केली होती परंतू काही निवडक ग्रामपंचायती वगळता कोणीही सदर साहित्य उपलब्ध करून दिले नाही. मास्क न मिळाल्यामुळे नाईलाजास्तव तोंडाला रुमाल बांधून शिक्षकांना सर्व्हेक्षण करावे लागले.
देशभरामध्ये कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाची साथ मोठ्या प्रमाणात पसरलेली असल्याने आपल्या जिवाची पर्वा न करता राष्ट्रीय आपत्तीच्या काळात शिक्षकांनी दिलेली जबाबदारी चोख बजावली. आपत्ती व्यवस्थापन हे राष्ट्रीय कार्य असून त्यास सहकार्य करणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे परंतू त्यांना आरोग्याच्या योग्य सोयी सुविधा पुरविणे व त्यांच्या जिविताचे संरक्षण करणे व हमी देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांना विमा संरक्षण द्यावे व पीपीई किट उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आलेली आहे.
कुटुंब सर्व्हेक्षण करताना कुटुंब प्रमुखांकडून ओळखपत्र दाखविने बाबत विचारणा केली जाते.परंतू प्रशासनाच्या वतीने शिक्षकांना अद्याप ओळख पत्र देण्यात आलेले नसून काही ठिकाणी महिला शिक्षकांना घराबाहेर काढण्याचे धक्का दायक प्रकार घडले आहेत त्यामुळे सर्व शिक्षकांना तात्काळ ओळख पत्र देण्याची मागणी आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर व सरचिटणीस सुनिल भेके यांनी केली आहे.