लोणावळा (वार्ताहर) – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोणावळा शहर सोमवार, मंगळवार (दि. 13, 14) असे दोन दिवस बंद राहणार आहे. शहरातील व्यापारी, भाजीपाला विक्रेते, मेडिकल असोसिएशन आणि चिकन मटण विक्रेते यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय जाहीर केला आहे.
नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, सहायक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळा नगर परिषदेच्या कार्यालयात सदर बैठक झाली. या बैठकीत दोन दिवस लोणावळा शहर संपूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
शहरातील सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात येणार असून शनिवारपासून शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने रोज सकाळी 9 ते दुपारी 1 तसेच संध्याकाळी 4 ते 6 दरम्यान सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
गर्दी कमी करण्यासाठी लोणावळा शहर पोलीस स्टेशन आणि लोणावळा नगर परिषद यांच्या वतीने कुमार रिसॉर्ट, इंद्रायणी पूल आणि कैलासनगर पूल या ठिकाणी बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर चेक नाके बसवून प्रवेश देणे बंद करण्यात आले आहे.