बोपखेल (वार्ताहर) – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बोपखेलमधील तरुण आणि ग्रामस्थांनी बाहेरून येणाऱ्या वाहनांना व नागरिकांना बोपखेलमध्ये येण्यास मज्जाव केला आहे. तरीदेखील काही वाहने व नागरिक वेगवेगळी कारणे सांगून बोपखेलमध्ये येत असल्याचे ग्रामस्थाच्या लक्षात आल्याने नागरिकांनी मिळून बोपखेलमध्ये येणारा एकमेव मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.
दिघी, विश्रांतवाडी येथून बोपखेलमध्ये येणाऱ्या रस्त्यावर नागरिकांनी प्रतिबंद केला आहे. गावातील नागरिकांच्या येथे पाहरा देण्यासाठी ड्युटी लावण्यात आली आहे. गावात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची चौकशी करून तो गावातील रहिवासी असेल तरच त्याला सोडण्यात येत आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गावकऱ्यांनी ही शिक्कल लढविली आहे. आपल्या गावातील नागरिक सुरक्षित राहावेत, हीच भावना यामागे आहे, आशी माहिती शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष चेतन घुले व युवकांनी व ग्रामस्थांनी दिली. गर्दी न करण्याच्या सूचना दुकानदार व मेडिकलवाल्यांना देण्यात आल्या आहेत.