अमेरिका ठरला जगातील पहिलाच देश
वॉशिंग्टन : करोनाने अमेरिकेत अवघ्या 24 तासांत 2 हजार 108 जणांचा बळी घेतला. एकाच दिवसात तो आकडा गाठणारा अमेरिका हा जगातील पहिला देश ठरला आहे. जगातील सर्वांधिक बळींची नोंद होणारा देश ठरण्याच्या दिशेने आता अमेरिकेची दुर्दैवी वाटचाल सुरू आहे.
जगभरात 17 लाखांहून अधिक रूग्णांना करोनाचा संसर्ग झाला आहे. अमेरिकेत सर्वांधिक बाधित असून ती संख्या 5 लाखांवर गेली आहे. अमेरिकेतील मृतांच्या संख्येने 18 हजार 800 चा टप्पा ओलांडला आहे. आता जगात सर्वांधिक बळींची नोंद झालेल्या इटलीजवळ ती संख्या पोहचली आहे. बळींच्या आकडेवारीत स्पेन आणि फ्रान्स हे देश जगात अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत.
स्पेनमध्ये 16 हजारांहून अधिक तर फ्रान्समध्ये 13 हजारांहून अधिक रूग्ण दगावले आहेत. मृतांच्या संख्येत ब्रिटनही लवकरच 10 हजारांचा टप्पा गाठेल, अशी स्थिती आहे. इराणमध्ये करोनाने 4 हजारांहून अधिक बळी घेतले आहेत. मृतांच्या संख्येत आता बेल्जियमनेही चीनला मागे टाकले आहे. मागील वर्षाच्या अखेरीस सर्वप्रथम चीनमध्ये करोनाचा प्रादुर्भाव आढळला. त्या देशात आतापर्यंत 3 हजार 339 जण मृत्युमुखी पडले आहेत. चीनला ठप्प करणाऱ्या करोनाचा नंतर वेगाने जगभरात फैलाव झाला. त्यामुळे 210 देशांना आणि प्रदेशांना त्या विषाणूशी लढा द्यावा लागत आहे.