बंगलुरू – कर्नाटकातील भाजप आमदाराने आपल्या शेकडो समर्थकांना गोळा करून वाढदिवसाची जंगी पार्टी केल्याचे उघड झाले आहे. देशभर करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असताना या आमदाराने ही पार्टी केल्याने त्याच्यावर टीकेची झोड सुरू झाली आहे. एम जयंत असे या आमदाराचे नाव असून ते तुमकुरू जिल्ह्यातील तुरूवेकेरे मतदार संघातील आमदार आहेत. त्यांनी वाढदिवस त्यांच्या गावात साजरा केला आणि उपस्थितांना केक आणि बिर्याणीची मेजवानी दिली.
गेल्या 15 मार्चला बेलगावी येथे एका ज्येष्ठ भाजप नेत्याने करोनाचे निर्बंध असताना जोषात विवाह समारंभ आयोजित केला होता त्याला त्या राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यासह अनेक ज्येष्ठ भाजप नेते उपस्थित राहिले होते. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली असतानाही या टीकेला न जुमानता या आमदाराने काल आपला वाढदिवस जल्लोषात साजरा केला.
कर्नाटकात करोनाच्या दोनशे केसेस आढळल्या असून या राज्याच्या सरकारने लॉकडाऊनची मुदत आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्याची शिफारस केंद्र सरकारला केली असतानाही त्या पक्षाच्या आमदारांनी ही वाढदिवस पार्टी केल्याने त्यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सुरू झाले आहे.