मुंबई : राज्यासह देशभरात कोरोनाने थैमान घातला आहे. राज्यात रोज नव्याने कोरोनाबाधितांचे आकडे समोर येत आहेत. यातच रत्नागिरीला एक चांगली बातमी समोर येत आहे. रातंगीरीतील पहिला कोरोनाचा रुग्ण कोरोनामुक्त झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
रत्नागिरीतील पहिल्या कोरोनाबाधित रूग्णाला गुरूवारी संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला. मुळचा गुहागर तालुक्यातील शृंगारतळी गावचा असलेला दुबईहून आलेला 50 वर्षीय इसम हा कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याच्यावर 19 मार्चपासून जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर आता त्याचे दोन्ही कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी साखरतर येथील महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आले होते. त्यानंतर संबंधित महिलेचा संपर्कात आलेल्या 17 जणांचे रिपोर्ट देखील तपासणीकरता पाठवण्यात आले होते. पैकी 10 रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये महिलेवर आयसीसुमध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा देखील समावेश आहे. या साऱ्यांचे रिपोर्ट देखील निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीनं ही महत्त्वाची बाब म्हणावी लागेल.