मुंबईचा सगळ्यात धोकादायक हॉटस्पॉट
मुंबई : मुंबईचा करोना फैलावासाठी सर्वाधिक धोकादायक परिसर असलेल्या धारावीत आणखी एका करोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. धारावीत आतापर्यंत हा तिसरा करोनाबळी आहे. आज केईएम रुग्णालयात दाखल असलेल्या 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ती धारावीच्या कल्याणवाडी परिसरातील रहिवाशी होती. तसेच हॉटस्पॉटच्या संख्येतही दुप्पटीने वाढ झाली आहे.
मुंबईत वरळी, प्रभादेवीनंतर आता धारावीचा हॉटस्पॉट सर्वांत धोकादायक ठरत आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीत दाटीवाटीच्या घरांमुळे हा विषाणू वेगाने पसरतो आहे. मार्चच्या शेवटी धारावीत पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर धारावीत आतापर्यंत 14 करोनारुग्ण सापळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे.
धारावीत रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. 10 भागांमध्ये भाजीविक्रीसुद्धा बंद आहे. ये-जा करणारे रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वेगाने वाढ होत असून ठराविक भागांमध्ये रुग्ण सातत्याने वाढत आहेत. लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या मुंबईत करोनाचा संसर्ग वाढत चालल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, मुंबईतील हॉटस्पॉटच्या संख्येतही वाढ होत आहे. गत आठवड्यात 146 असलेल्या हॉटस्पॉटची संख्या आता 381वर पोहोचली आहे. राज्यात लॉकडाउन असतानही सात दिवसांमध्ये त्यात 235ने वाढ झाली आहे. तसेच राज्यातील करोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्याही मुंबईत आहे.