मुंबई – करोनाच्या धोक्यामुळे इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धा रद्द होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर स्पर्धेच्या समालोचनाच्या माध्यमातून आर्थिक प्राप्ती करत असलेल्या पोटार्थी माजी क्रिकेटपटू अचानक एकवटले आहेत. केवीन पीटरसन, संजय मांजरेकर यांनी ही स्पर्धा होणे कर्मचारी वर्गासाठी आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
आयपीएलचे यंदा तेरावे वर्ष आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळतो. सध्या सर्व प्रकारचे क्रिकेट बंद आहे, अशा स्थितीत या लोकांना पोटापाण्याची व्यवस्था करणेही मुश्किल बनले आहे. हीच परिस्थिती पुढेही कायम राहिली तर त्यांचे अतोनात हाल होतील. निदान रोजंदारीवर तसेच मेहनतान्यावर काम करणाऱ्या लोकांसाठी तरी ही स्पर्धा खेळविली जाणे आवश्यक आहे, असे भारताचे माजी कसोटीपटू व समालोचक मांजरेकर यांनी स्पष्ट केले आहे.
मांजरेकर यांच्या मताला इंग्लंडचे माजी कसोटी क्रिकेटपटू व समालोचक केवीन पिटरसन यांनीही समर्थनदिले आहे. 29 मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली असून त्यावेळीही हीच परिस्थिती राहिली तर स्पर्धा कधी होणार याबाबत सध्या खलबते सुरु आहेत.
स्पर्धेतील संघ मालकांनी लोकांच्या जीवापेक्षा स्पर्धेला महत्व देत छोट्या स्वरुपात का होईना पण स्पर्धा खेळविण्याचा अट्टहास सुरुच ठेवला आहे. त्यातच आता या दोन पोटार्थी समालोचकांनी संघ मालकांच्या हाताला हात लावुन मम म्हटले आहे. स्पर्धा आत्ता झाली नाही तर ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या कालावधीतील किमान 37 दिवस हाती मिळाले तरी सामन्यांची संख्या कमी करुन तसेच केवळ 2 ते 3 मैदाने निश्चित करुन खेळविण्यासाठी सध्या संघ मालक आणि भारतीय किकेट नियामक मंडळाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.