मुंबई उच्च न्यायालय ः बाहेरची परिस्थिती भयानक
मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) – देशभरात मोठ्या प्रमाणात होत असलेला करोनाचा प्रादुर्भाव पाहता जेलमध्ये अससेल्या कैद्यांनी सध्या जेलमध्येच राहिलेले चांगले आहे. बाहेरची परिस्थिती सध्या जास्त भयानक आहे. या शब्दांत जामीनासाठी हायकोर्टात याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यांना हायकोर्टाने मोलाचा सल्ला दिला आहे. खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आणि गेले दीड वर्षे तळोजा जेलमध्ये असलेल्या मिश्रा याने करोनाच्या पार्श्वभूमीवर जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर आज न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यासमोर व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली.
यावेळी न्यायालयाने वरळीचे उदाहरण देत “तुम्हाला कल्पना नसेल की मुंबईत सध्या काय सुरु आहे, अशा शब्दात चिंता व्यक्त केली. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील अनेक विभाग एकापाठोपाठ एक सील करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आणखीन एका नव्या माणसाला बाहेर सोडून त्याच्यासह इतरांनाही करोनाची लागण होण्याचा धोका पत्करता येणार नाही, असे स्पष्ट करत जितेंद्र मिश्राचा तात्पुरता जामीन अर्ज फेटाळून लावला.
व्हिडिओ कॉन्फरसिंगचा दिवस
मुंबई उच्च न्यायालयात गुरूवारचा सुनावणीचा दिवस हा एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे. आज प्रथमच व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यासमोर नऊ प्रकरणांवर सुनावणी झाली.त्यात वकील, पक्षकारांसह माध्यमातील प्रतिनिधींनीसह सुमारे 450 जणांनी आपापल्या घरातून व्हिडिओ कॉन्फरसिंग ऍप “झूम’च्या माध्यमातून आपली हजेरी लावली. करोनाच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाचे कामकाज सध्या केवळ दुपारी 12 ते 2 या दोन तासांसाठीच सुरू आहे. त्यातही करोनाचा वाढता प्रभाव पाहता आता हायकोर्टाने सुनावणी डिजिटल पद्धतीने घेण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.