नवी दिल्ली – जागतिक बॅंकेने एक अब्ज डॉलर्सचे आरोग्य पॅकेज मागील आठवड्यात जाहीर केल्यानंतर आता आणखी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक चिंता भारतासमोर निर्माण झाली आहे. ही चिंता जागतिक बॅंकेच्या नव्या मदतीमुळे दूर होईल. ही दुसरी आर्थिक मदत देखील एक अब्ज डॉलर्सचीच असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या मदतीतून टेस्ट किट्स, विलगीकरण कक्ष उभारणे, वैयक्तिक सुरक्षेची वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेटर्स आणि औषधांच्या खरेदी केली जाईल, असे जागतिक बॅंकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आम्ही सामाजिक सुरक्षेसाठी पॅकेज देऊ. त्यानंतर भारतातील लघु आणि मध्यम उद्योगांना आर्थिक आधार देण्यासाठी मदत करू. या माध्यमातून त्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जांत वृद्धी होण्यास मदत मिळेल, असे जागतिक बॅंकेचे भारतातील संचालक जुनेद अहमद यांनी सांगितले. कोरोनाच्या संदर्भात भारतात राबवला जाणारा आरोग्य कार्यक्रम जगातील पहिल्याच प्रकारचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
करोनामुळे भारताला बसलेल्या धक्क्याचा सामना करण्यासाठी सर्वव्यापी प्रतिसादाची गरज आहे. भारत आपल्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 3 ते 5 टक्के खर्च करू शकेल, असेही त्यांनी सांगितले.