- काहीसा दिलासा ः निजामुद्दीन येथून आलेल्या तबलिगीमुळे भीतीचे वातावरण
पिंपरी – निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन आलेल्या नागरिकांचा शोध पोलीस आणि प्रशासन घेत होते. दरम्यान दहा जण सापडले नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. परंतु ते दहा जण शहरात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पिंपरी चिंचवड शहरात 32 जण आल्याची माहिती केंद्र सरकारने पिंपरी चिंचवडमधील पोलीस आणि महापालिकेस दिली. अत्यंत वेगाने हालचाली करीत प्रशासनाने 32 पैकी 22 जणांना ताब्यात घेतले. उर्वरित दहाजण पिंपरी चिंचवड शहरात नसल्याची खात्री झाल्याने पोलीस आणि महापालिका प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.
निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमावरून आलेल्या बहुतांश तबलिगींना “करोना’ या साथीच्या आजाराची लागण झाली. कार्यक्रमास गेलेल्या 32 जणांची यादी केंद्र सरकारने पिंपरी चिंचवड महानगर पालिका आणि पोलिसांना पाठविली. या तकलिकींकडून करोनाचा प्रसार होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने अत्यंत वेगाने हालचाली करीत त्यांना ताब्यात घेण्यास सुरवात केली. 32 पैकी 22 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र उर्वरित दहा जणांचा शोध लागत नसल्याने प्रशासनाची बेचैनी वाढत होती. हे दहाजण कुठे आहेत याचा शोध घेतला असता ते पिंपरी चिंचवड शहरात नसल्याचे समजले. पण ते कोठे आहेत, याचा पोलिसांनी शोध घेतला. ते तबलिगी ज्या शहरात आहेत, तेथील प्रशासनाला पिंपरी चिंचवड महापालिकेने कळविले आहे. त्या दहाही जणांना संबंधित प्रशासनाने ताब्यात घेतले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने ज्या 22 तबलिगींना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी तीन जणांना करोनाची लागण झाली असल्याचे दिसून आले. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या पाच नातेवाईकांनाही करोनाची लागण झाली. करोनाची लागण झालेल्यां नऊ जणांपैकी एकजण खडकी कॅन्टोमेन्ट बोर्डाच्या हद्दीतील आहे. यामुळे शहरातील करोना बाधितांची सध्याची संख्या आठ आहे. तसेच आठपैकी एकावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.