संयुक्तराष्ट्रे – जगभर निर्माण झालेल्या करोना महामारीच्या संकटावर चर्चा करण्यासाठी संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाची येत्या गुरूवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. व्हिडिओ टेलिकॉन्फरसिंग द्वारे ही बैठक होणार असून त्यात करोनामुळे निर्माण झालेली आव्हाने आणि या रोगावर नियंत्रण मिळवण्याच्या उपाययोजना यावर चर्चा होणार आहे. या चर्चेला संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्तोनिओ गुटेर्रेस हेही उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर ते एक प्रसिद्धी निवेदनही जारी करण्याची शक्यता आहे.
करोनामुळे जगभरात 75 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचे बळी गेले आहेत. ही बैठक तातडीने घेऊन या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी एकसंध धोरण ठरवले जावे अशी मागणी जगातील पाच ते सहा देशांनी केली होती. जगात करोनाची समस्या निर्माण होऊन चार महिने होऊन गेले आहेत पण त्यावर चर्चा करण्यासाठी सुरक्षा मंडळाची एकदाही बैठक झालेली नाही. या विषयावर चीन आणि अमेरिकेत असलेला वाद या कारणीभूत ठरला आहे असे सांगण्यात येत आहे. या विषाणुंचा प्रसार नेमका कोठून झाला यावर दोन्ही देश एकमेकांवर आरोप करीत आहेत.
चीनमधूनच या विषाणुंचा प्रादुर्भाव सुरू झाला याचा उल्लेख सुरक्षा मंडळाच्या ठरावात केला जावा असा आग्रह अमेरिकेने धरला आहे पण चीनने त्याला विरोध दर्शवला असल्याने जरी बैठक झाली तरी त्यात कोणताही ठराव संमत होणार काय यावर साशंकता व्यक्त केली जात आहे. आम्ही या रोगावर यशस्वी मात केली आहे त्याचाही उल्लेख या ठरावात व्हावा यासाठी चीन आग्रही आहे त्याला अमेरिकाचा विरोध आहे.