बीजिंग – करोनाचा फैलाव ज्या चीनमधून जगभर झाला, तेथील स्थिती आता हळूहळू सुधारत असल्याचे चित्र दिसते आहे. कालच्या दिवशी चीनमध्ये करोनाची लागण झालेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, असे तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले. चीनमध्ये यावर्षी जानेवारीमध्ये प्रथम करोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. तेंव्हापासून काल प्रथमच एखाद्या दिवशी एकही मृत्यू नोंदावला गेला नाही. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने ही माहिती दिली.
गेल्या दोन महिन्यातील घडामोडींकडे बघता चीनसाठी हा दिवस मैलाचा दगड असल्याची प्रतिक्रिया “एनएचसी’ने दिली आहे. करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या हुबेई प्रांतातही काल एकही मृत्यू झाला नाही, याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.
कालपर्यंत चीनच्या मुख्य भूभागावरील करोनाबाधितांची एकूण प्रकरणे 81,740 वर पोचली आहेत. अद्याप 1,242 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 77,167 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले आहे. तर 3,331 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.