गोवाहटी – आसाममधील क्वारंटाईन सेंटरबाबत आक्षेपार्ह जातीय वक्तव्य करणाऱ्या आमदाराच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर या आमदाराला आज अटक करण्यात आले होते. अमिनूल इस्लाम असे या विरोधी आमदाराचे नाव आहे. क्वारंटाईन सेंटरमधील स्थिती बंधकांसाठीच्या कोंडवाड्यापेक्षाही वाईट आहे, असे ते म्हणाले होते.
या संदर्भात ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे आमदार अमिनूल इस्लाम आणि अन्य एका व्यक्तीमधील संभाषणाचा ऑडिओ मेसेज व्हायरल झाला होता. त्यामध्ये “आसाममधील क्वारंटाईन सेंटर धोकादायक आणि बेकायदेशीर घुसखोरांसाठी असलेल्या कोंडवाड्यांपेक्षाही वाईट आहे.’ असे आमदार म्हणताना ऐकू येते आहे. आसाममधील भाजपचे सरकार मुस्लिमांविरोधात कारस्थान करत आहे. वैद्यकीय कर्मचारी मुस्लिमांचा छळ करत आहेत.
गेल्या महिन्यात दिल्लीत निजामुद्दीनमध्ये झालेल्या तबलिगी धार्मिक समारंभास उपस्थित राहून परतलेले जरी निरोगी असले तरी त्यांना संसर्ग झाल्याचे दिसण्यासाठी इंजेक्शन दिली जात आहेत, असा आरोपही या आमदार महोदयांनी केला आहे.
देशभरात सापडलेल्या करोनाबाधित रुग्णांपैकी एकतृतीयांश रुग्ण हे तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमावरून परतलेले आहेत. करोनाबाधित रुग्णांसाठी आसाम सरकारने गोवाहटीमधील सारू सोजाय स्टेडियमसह दोन स्टेडियममध्ये 2 हजार खाटांची सुविधा असलेले तात्पुरते रुग्णालय उभारले आहे. आसाममधील सर्व 33 जिल्ह्यांमध्ये करोनाबाधित रुग्णांसाठी उपचार केंद्रे सुरू केली गेली आहेत.
वादग्रस्त वक्तव्य उघड झाल्यावर आसाम पोलिसांनी अमिनूल इस्लाम यांना सोमवारी रात्री चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि मंगळवारी सकाळी त्यांना अधिकृतपणे अटक करण्यात आली. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.