श्रीनगर- जम्मू काश्मीरमध्ये रविवारी झालेल्या वेगवेगळ्या चकमकीमध्ये 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यापैकी 4 दहशतवादी शनिवारी मारले गेले होते. तर उर्वरित पाच दहशतवादी ताबा रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये मारले गेले, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सांगितले.
आज झालेल्या कारवाईदरम्यान लष्कराचे तीन अधिकारीही शहीद झाले. गोळीबारादरम्यान जखमी झालेल्या तिघांना घटनास्थळावरून हलवून उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र आणखी दोन जवानांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. उर्वरित जखमी सुरक्षा रक्षकांवर उपचार सुरू आहेत, असे संरक्षण प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. घटनास्थळी दुपारही चकमक सुरू होती, असे संरक्षण सूत्रांनी सांगितले.
जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शनिवारी झालेल्या चकमकीमध्ये हिज्बुल मुजाहिदीनचे चार दहशतवादी मारले गेले होते. दक्षिण काश्मीरमधील नागरिकांच्या हत्येमागे हे दहशतवादी होते, असे जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी सांगितले.
कुलगाम जिल्ह्यातील मंझगाम भागातील हार्डमांड गुरी येथे दहशतवादी असल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने पोलिसांच्या मदतीने कसून शोध घेतला. पहाटे 5.45 च्या सुमारास अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. कुलगाममधील रहिवासी शाहीद सादिक मलिक, अनंतनागचा रहिवासी मोहम्मद अशर्रफ मलिक उर्फ सद्म आणि हनान चावलगामचा रहिवासी वानार फारूक अशी चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. चौथ्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.