लंडन: कोरोनाची बाधा झालेल्या उच्चपदस्थ आणि हाय-प्रोफाईल व्यक्तींमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा समावेश झाला आहे. जगभरात हाहाकार उडवणाऱ्या विषाणूचा संसर्ग झाल्याची पुष्टी मिळाल्यानंतर जॉन्सन यांनी स्वत:ला विलग करून घेतले.
याआधी ब्रिटनच्या राजघराण्याचे सदस्य असणाऱ्या प्रिन्स चार्ल्स यांना करोनाची बाधा झाल्याचे आढळले. त्यापाठोपाठ जॉन्सन यांच्याविषयीची माहिती पुढे आली. त्यांनी स्वत:च सोशल मीडियावर व्हिडीओ संदेश जारी करून कोरोनाच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्याचे नमूद केले.
अर्थात, सरकारचा प्रमुख म्हणून यापुढेही जबाबदारी सांभाळण्याची ग्वाही त्यांनी दिली. आता ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कामकाज करणार आहेत. कोरोनाने संपूर्ण जगालाच विळखा घातल्याचे चित्र आहे. त्याला ब्रिटनही अपवाद ठरलेला नाही. त्या देशातील 11 हजारहून अधिक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत करोनाने 578 जणांचा बळी घेतला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ब्रिटन सरकार लढत आहे. अशातच त्या देशाच्या पंतप्रधानांनाच त्या विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.