नवी दिल्ली : कोरोनामुळे भीतीचे वातावरण सर्वत्र असले तरी मानवतेचे आणि कृतज्ञतेचे मोरपीस फिरवणारे क्षणही समोर येत असतात. पोलिसांच्या मनावतेला कृतज्ञतापूर्वक मानाचा मुजरा करत एका मुस्लिम महिलेने आपल्या नवजात अपत्याचं नाव ठेवलंय रणविजय! एरवी आश्चर्यकारक वाटणारी घटना घडलीय बरेलीमध्ये…
त्याचं झालं असं , ही महिला आपल्या पतीसह रहात होती नोएडामध्ये. त्याचं मुळ गाव बरेली. आता बाळंतपण करायचं म्हणजे मनुष्यबळं तर हवंच. त्यामुळे गावात जाणं तर गरजेचं होतं पण जायचं कसं? कारण बाहेर लॉक डाऊन. रस्त्यावर चिटपाखरू दिसेना. तर वाहन कोठून मिळणार, मिळालंच तर प्रवासास असणारी राज्यबंदी… विचार करून त्यांचं डोकं फुटायची वेळ आली.
अखेर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यावेळी नोएडा येथील पोलिस उपायुक्त कुमार रणविजय यांना ही माहिती समजली. त्यांनी कायदा बाजूला ठेवून माणुसकीचं अनोखं दर्शन घडवलं. त्यांनी वाहनाची व्यवस्था करून या दाम्पत्याला बरेलीला पोहोचवण्याची व्यवस्था करण्यास मदत केली. या दाम्पत्याला धीरही दिला. ही महिला बरेलीला पोहोचली.
यथावकाश बरेलीतील एका रुग्णालायात तीनं एका मुलाला जन्म दिला. त्यावेळी तिला नजरेसमोर आले देवदुतासारखे मदतीला धावून येणारे पोलिस उपायुक्त रणविजय आणि या दाम्पत्यानं आपल्या चिमुड्याचं नाव ठेवलं रणविजय. सध्याच्या जातीय द्वेषानं भरलेल्या वातावरणात मानवतेचा हा रणविजयच आहे, नाही का?