तीन अधिकारी सदस्यांच्या रडारवर
पुणे – महापालिकेतील तीन अधिकाऱ्यांनी केलेल्या ऑस्ट्रेलिया “टूर’ वरून महापालिका मुख्यसभेत गदारोळ झाला. या अधिकाऱ्यांची चौकशी तर कराच, परंतु त्यांना निलंबित करा, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले का, असाही प्रश्न सदस्यांनी विचारला.
“प्रोजेक्ट टेस्टिंग’साठी तीन अधिकारी ऑस्ट्रेलियाला गेले. आधीच करोनाचे संकट आणि त्यातून पूर्वपरवानगी न घेता हे तीन अधिकारी गेलेच कसे, असा प्रश्न सदस्यांनी विचारला. असे कोणते प्रकल्प आहेत जे पाहण्यासाठी हे अधिकारी गेले, अशी विचारणा यावेळी करण्यात आली. ठेकेदारांच्या पैशांवर हे अधिकारी जातात, असा आरोपही करण्यात आला. त्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली. त्यावर ठेकेदारांच्या पैशांतून हे अधिकारी गेले आहेत का, याचीही चौकशी केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.
…तर कारवाई
ऑस्ट्रेलियातही करोनाचा कहर आहे. अशात हे अधिकारी तिकडे जाऊन आले आहेत. त्यांचे 14 दिवस विलगीकरण न करता त्यांना महापालिकेत तसेच फिरू दिले जात आहे, असा प्रश्नही सदस्यांनी उपस्थित केला. त्यांची चौकशी करण्यात येईल, आणि शासननियमाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल, असे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सभागृहात स्पष्ट केले.