पालकांना लॉटरीचे “एसएमएस’ उद्या जाणार : 31 मार्चनंतर कागदपत्रांची तपासणी
पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के प्रवेशासाठी लॉटरी काढण्यात आली आहे. लॉटरी लागल्याचे “एसएमएस’ पालकांना गुरुवारी (दि.19) जाणार आहेत. लॉटरी लागलेल्या पालकांनी 31 मार्चनंतर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची तपासणी करुन शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे.
“आरटीई’अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील मुलांना मोफत शिक्षण देण्यात येत असते. त्यामुळे या प्रवेशासाठी पालकांमध्ये स्पर्धा लागलेली आहे. या प्रवेशासाठी राज्यातील 9 हजार 331 शाळांनी नोंदणी केली असून यात 1 लाख 15 हजार 454 प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आलेल्या आहेत. या जागांसाठी 2 लाख 91 हजार 665 ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत (विद्या प्राधिकरण) लहान मुलांच्या हस्ते प्रवेशाची लॉटरी काढण्यात आली आहे. यावेळी प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, सहसंचालक दिनकर टेमकर, प्रशासन अधिकारी शैलजा दराडे, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक अनुराधा ओक आदी उपस्थित होते. लॉटरीची प्रक्रिया राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे दाखविण्यात आली व त्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
प्रवेशासाठी जेवढ्या जागा उपलब्ध आहेत तेवढ्यांसाठी ऑनलाइन लॉटरीची प्रक्रिया रन होणार आहे. वेटिंग लिस्टमध्ये तेवढ्याच जागा समावेश करण्यात येणार आहे. 19 मार्च रोजी दुपारनंतर पालकांना लॉटरी लागल्याचे किंवा वेटिंग लिस्टमध्ये नाव असल्याचे “एसएमएस’ पाठवण्यात येणार आहेत. पालकांनी केवळ “एसएमएस’वरच अवलंबून न राहता “आरटीई’ पोर्टलवरही माहिती पाहणे आवश्यक आहे.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉटरी काढण्यासाठी यंदा जाहीर कार्यक्रम घेण्यात आलेला नाही. यामुळे प्रवेशाच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आलेला आहे. प्रवेशाबाबतच्या सूचना वेळोवेळी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन गर्दी करू नये
– दत्तात्रय जगताप, प्राथमिक शिक्षण संचालक