वासुंदे-दौंड तालुक्यातील जिरायती भागांमध्ये असलेल्या खाण मालकांकडून दिवसेंदिवस खनिकर्म जोरात सुरू आहे. प्रशासनाच्या नियमांना येथील खाण मालकांकडून कर बुडवून हरताळ फासला जात आहे. वासुंदेतील खाण पट्ट्यामधील खाण मालक प्रदूषणाचे कोणतेच नियम पाळत नसल्याने दिवसेंदिवस येथील स्थानिक शेतकरी त्रस्त झाले आहेत. खाण मालकांकडून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी संबंधित विभागाने घालून दिलेल्या अटींचे कुठेही पालन केले जात नाही, मात्र यावर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही.
दगड खाणीमधून निर्माण होणारे प्रदूषण रोखण्यासाठी संबंधित दगड खाण मालकाने वृक्षारोपण करणे गरजेचे असते, मात्र कुठेही वृक्षारोपण केलेले दिसून येत नाही. यावर वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का? असा सवाल शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.
रात्री अपरात्री सुरू असणारे खडीक्रशर व बेकायदेशीर सुरू असलेल्या बोअर ब्लास्टिंग संदर्भात तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता मंडल अधिकारी यांना पाठवून माहिती घेण्यात येईल व पुढील कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात येत आहे .
- संबंधित खाणींची माहिती मंडल अधिकारी यांना त्वरीत पाठवून चौकशी करून व संबधित खाण मालकांचे उत्खनन आदेश पाहून लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-संजय पाटील, तहसीलदार, दौंड.