जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अज्ञातावर गुन्हा
सातारा, दि.16 (प्रतिनिधी)
जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात कोरोना संशयिताची माहिती सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ. सायली सदानंद सुपेकर (रा.मंगळवार पेठ,सातारा) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आबुधाबीवरून आलेल्या एका युवकाला कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने जिल्हा रुग्णालयात दि. 15 रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या तपासण्यांचे अहवाल पुण्यावरून आल्यानंतरच तो कोरोना बाधीत आहे अथवा नाही याबाबत खुलासा होणार होता.
मात्र, त्यापुर्वीच त्या रुग्णाची सर्व माहिती असलेला जिल्हा रुग्णालयातील फॉर्म सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संबंधित रुग्णांची माहिती उघड न करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या होत्या.
त्यानंतरही जिल्हा रुग्णालयातून ही माहिती व्हायरल झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लघंन झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.